भुलाबाईची गाणी | Bhulabai chi Gani | भोंडल्याची गाणी | Bhondla chi Gani | Bhondla Songs in Marathi | Bhulabai songs in Marathi
भोंडला किंवा भुलाबाई हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे.आपल्या महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील काही भागातील प्रसिद्ध लोक कथागीत महोत्सव म्हणजे भुलाबाई हा होय. भाद्रपद पौर्णिमेपासून शरद पौर्णिमेपर्यंत चालणारा हा महोत्सव सुमारे एक महिना साजरा केला जातो.महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा पाळत असल्याचे दिसते.मुलींचे पावसाळ्यातील समूह नृत्य असेही या खेळाला संबोधिले जाते.
गणपती झाले की येणारे नवरात्र म्हणजे नुसती धमाल. देवीची आरती करताना केले जाणारे उपवासाचे पदार्थ, गरबा किंवा दांडीयाचे कार्यक्रम, एकमेकांकडे हळदी-कुंकवाला जाणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या काळात लहान मुलींचा आवर्जून केला जाणारा भोंडला. अनेक भागात या खेळाला हादगा असेही म्हटले जाते. मध्यभागी हत्ती ठेवून त्या बाजूने फेर धरुन गाणी म्हटली जातात. पूर्वीच्या काळी अशाप्रकारचे खेळ किंवा सणवार हे महिलांनी, मुलींनी एकत्र येण्याचे निमित्त होते. मात्र आजही ही परंपरा कायम जपत घरोघरी किंवा सार्वजनिक ठिकाणी आवर्जून भोंडल्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आधुनिक काळात भोंडला हा केवळ मुलीचा घरगुती कार्यक्रम राहिला नसून त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. विविध सामाजिक संस्था, महिला संघटना , राजकीय पक्ष हे महिला- मुलींसाठी भोंडला आयोजित करतात. परदेशातील भारतीय लोक तिथे स्थानिक पातळीवर भोंडला आयोजित करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.या लेखाच्या माध्यमातून भुलाबाई या महोत्सवानिमित्त गायल्या जाणाऱ्या भुलाबाईची गाणी | Bhulabai chi Gani | भोंडल्याची गाणी | Bhondla chi Gani | Bhondla Songs in Marathi लिखाण केलं आहे. तरी आपण या गीतांचे वाचन करून आपल्या लहान मुलीना देखील सांगा.
भुलाबाईची गाणी (भाद्रपदचा महिना आला ) – Bhulabai chi Gani
भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।
गेल्या बरोबर पाट बसायला । विनंती करून यशोदेला ।
सर्व मुली गोळा झाल्या । टिपर्या मध्ये गुंग झाल्या ।
प्रसाद घेऊन घरी गेल्या ।
भुलाबाईची गाणी (पहिली गं भुलाबाई) – Bhulabai chi Gani
पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी
आवसनीच पाणी जस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ
ठेविला कंठ राणा भुलाबाईची
ठोकिला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे
टीकाळीचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ एकसनी
माता पुढ टेकसनी
टेकसनीच एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे
तांब्या पितळी न्हाय गं
हिरवी टोपी बाय गं
हिरवी टोपी हारपली
सरपा आड लपली
सरप दादा हेकोडा
जाई आंबा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे
चिंचाखालची रानोबाय
चिंचा वेचत जाय गं
शंभर पान खाय गं
खाता खाता रंगली
तळ्यात घागर बुडाली
तळ्या तळ्या साखळ्या
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
थालीभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर मेण लाऊ द्या
बोटभर कुंकू लाऊ द्या
जांभळ्या घोड्यावर बसु द्या
जांभळ्या घोड्याचे उलटे पाय
आऊल पाऊल अमरावती गाव
अमरावती गावचे ठासे ठुसे
दुरून भुलाबाई चे माहेर दिसे
भुलाबाईची गाणी (नदीच्या काठी राळा पेरला) – Bhulabai chi Gani
नदीच्या काठी राळा पेरला
बाई राळा पेरला
एके दिवशी काऊ आला
बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेल
बाई तोडून नेल
सईच्या अंगणात टाकून दिल
बाई टाकून दिल
सईन उचलून घरात नेल
बाई घरात नेल
कांडून कुंडून राळा केला
बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली
बाई बाजारात गेली
चार पैशाची घागर आणली
बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली
बाई पाण्याला गेली
मधल्या बोटाला विंचू चावला
बाई विंचू चावला
भुलाबाईची गाणी (सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली) – Bhulabai chi Gani
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
गुलाबाचे फूल माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
मोगऱ्याची फुले माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
भुलाबाईची गाणी ( यादवराया राणी घरास येईना कैसी ) – Bhulabai chi Gani
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
सासूबाई गेल्या समजावयाला
चल चल सूनबाई अपुल्या घराला
अर्धा संसार देते तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
सासरे गेले समजावयाला
चल चल सूनबाई अपुल्या घराला
तिजोरीची चावी देतो तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
दीर गेले समजावयाला
चला चला वहिनी अपुल्या घराला
नवीन कपाट देतो तुम्हाला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
जाऊ गेली समजावयाला
चला चला जाऊबाई अपुल्या घराला
जरीची साडी देते तुम्हाला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
नणंद गेली समजावयाला
चल चल वहिनी अपुल्या घराला
चांदीचा मेखला देते तुजला
मी नाही यायची अपुल्या घराला.
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
पती गेला समजावयाला
चल चल राणी अपुल्या घराला
लाल चाबूक देतो तुजला
मी येते अपुल्या घराला
यादवराया राणी घरास आली कैसी
सासूरवाशीण सून घरास आली कैसी
भुलाबाईची गाणी ( आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय ) – Bhulabai chi Gani
आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,
लेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय
कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,
घरी नंदा जावा, करतील माझा हेवा
नंदाचा बैल येईल डोलत,
सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीरं
भुलाबाईची गाणी ( नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी ) – Bhulabai chi Gani
नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी
तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी,
आता माझे दादा येतील गं, येतील गं,
दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं,
दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव पाठी
घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥
भोंडल्याची गाणी (अडकित जाऊ, खिडकीत जाऊ) – Bhondla Song
अडकित जाऊ, खिडकीत जाऊ
खिडकीत होतं ताम्हन
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा वामन
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होता बत्ता
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा दत्ता
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती वांगी
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा हेमांगी
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती दोरी
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा गौरी
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती पणती
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा मालती
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती घागर
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा सागर
भोंडल्याची गाणी (अक्कण माती चिक्कण माती) – Bhondla Songs in Marathi
अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं.
भुलाबाईची गाणी (ऐलमा पैलमा) – Bhondlyachi Gaani
ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी पारवा घुमतोय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी आयुष्य देरे भामाळी
माळी गेला शेताभाता पाऊस पडला येताजाता
पडपड पावसा थेंबोथेंबी,
थेंबोथेंबी आडव्या लोंबी
लोंब्या लोंबती अंगणी
अंगणा तुझी सात वर्ष भोंडल्या तुझी सोळा वर्ष
अतुल्या मातुल्या चरणी चातुल्या
चरणी चारचोंडे हातपाय खणखणीत गोंडे
एकेक गोंडा वीसवीसाचा साड्या डोंगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो अडीचशे पावल्यांनो
भुलाबाईची गाणी (एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू) – Ek Limbu Zelu Bai
(Bhulabai Song)
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू
पाचा लिंबाचा पानोठा,
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी होडी
येता जाता कमळ तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अग अग राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लार बाळू
चिल्लार बाळाला भूक लागली
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी……
भुलाबाईची गाणी (ऐलमा पैलमा) – Bhondlyachi Gaani
तामण बाई तामण अस कस तामण
भूलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता
भूलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा हेमांगी
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी
भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा गौरी
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती पणती
भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा मालती
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती घागर
भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा सागर
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला
भूलोजीला लेक झाला साखरपाना विसरला
आणा आणा पारीस उगळा उगळा काथ
आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस
शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे
बाणा बाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा
आणा आणा लवकर,
वेळ होतो आम्हाला
जाऊ द्या आम्हाला,
भुलाबाईचे गाणे म्हणायला ॥
भुलाबाईची गाणी (ऐलमा पैलमा) – Bhondlyachi Gaani
काळा कोळसा झुकझुक पाना
पालखीत बसला भुलोजी राणा
भुलोजी राण्याचे कायकाय (आ)ले
सारे पिंपळ एक पान
एक पान दरबारी
दुसर पान शेजारी
शेजाऱ्याचा डामा डुमा
वाजतो तसा वाजू द्या
आम्हाला खेळ मांडू द्या
खेळात सापडली लगोरी
लगोरी गेली वाण्याला
वाण्या वाण्या सोपा दे
सोपा माझ्या गाईला
गाई गाई दुध दे
दुध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या गोंडे दे
(गोंडे माझ्या राज्याला)
तेच गोंडे लेऊ सासर जाऊ
सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे
पंढरीच्या वाटे नारळ फुटे
0 Comments: